नाशिक इगतपुरी न्यूज 18 हजार विद्यार्थी खाताय सडका भाजीपाला, किडके धान्य, कच्च्या पोळ्या
इगतपुरी : मुंडेगाव येथील सेंट्रल किचनमधील दूरवस्थेची पाहणी करताना आमदार हिरामण खोसकर.

इगतपुरी : आदिवासी विभागाने सुरू केलेल्या अन्नपूर्णा सेंट्रल किचन या सुविधेतील भयावह स्थिती आमदार हिरामण खोसकर यांनी केलेल्या अचानक पाहणीतून उघड झाली आहे. मुंढेगाव (ता. इगतपुरी) आश्रमशाळेतील अन्नपूर्णा किचनकडून जिल्ह्यातील ४४ आश्रमशाळांमधील तब्बल १८ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी आहे. मात्र, तेथील किचनमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य असून, बाजारात विकला न जाणारा, खराब दर्जाचा भाजीपाला आणि दूषित अन्नपदार्थ वापरले जात असल्याचा आ. खोसकर यांनी गुरुवारी (दि. ९) पंचनामा केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ उजेडात आल्याने प्रशासन प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहे.सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात असल्याच्या तक्रारींची पुष्टी करण्यासाठी आमदार खोसकर यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता मुंढेगाव आश्रमशाळेला अचानक भेट दिली. त्यांच्या तपासणीदरम्यान धक्कादायक परिस्थिती उघड झाली. नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ४४ आश्रमशाळांमध्ये १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना सेंट्रल किचनमार्फत मिळणारा आहार अत्यंत खराब दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले. स्वयंपाकगृहात किडलेली आणि बुरशी युक्त हरभरा, वाटाणा, चवळी यांसह भेसळयुक्त डाळ आणि निकृष्ट तांदूळ वापरण्यात आल्याचे आढळले. “ज्याला जनावरंसुद्धा तोंड लावणार नाहीत, असे अन्न गरीब विद्यार्थ्यांना दिले जात आहे,” अशी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त झाली. यावेळी सेंट्रल किचनचे अधीक्षक महेंद्र सपकाळ आणि कैलास चव्हाण उपस्थित होते. आमदार खोसकर यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी पुढाकार घेत निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
काय आहे स्थिती
– स्वयंपाकासाठी कर्मचारी असूनही अन्नपूर्ण किचन सेंट्रलमध्ये मशीनद्वारे चपात्या केल्या जातात.
– चपात्या एकाचं बाजूने भाजल्या जातात, त्या कच्च्या राहतात.
– स्वयंपाकगृह तसेच धान्य आदी साहित्य ठेवलेल्या ठिकाणी अस्वच्छता.
– टेस्टिंग लॅब वर्षभरापासून बंद.
– दोन दिवसांपासून कापून ठेवलेला बटाटा, कीड लागलेली डाळ, निकृष्ट चिकी, भाजीपाला
विद्यार्थ्यांना सुदृढ आहार म्हणून फळं देण्याचे धोरण आहे. त्याविषयी अधीक्षक चव्हाण यांनी विचारले असा, आजवर फळं कधीच मिळाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कंत्राटी कामगाराने समोर आणली सत्यता
स्वयंपाक अन् पिण्यासाठी नदीतून टँकरने पाणी आणले जाते. तीन महिन्यांपासून फिल्टर बंद आहे. किचनमधील भांड्यांची दयनिय अवस्था झाली आहे. मुलांना चपाती डब्यात न देता प्लास्टिक पिशवीत दिली जाते. जी घामाने खराब होते. असे हे अन्न सुमारे १०० किलोमीटर परिसरातील आश्रमशाळांना पाठविले जाते, अशी वस्तुस्थिती एका कंत्राटी कामगाराने समोर आणली. व्यापाऱ्यांनी नाकारलेला माल पोषण आहारासाठी वापरला जातो. अन्न बेचव आणि निकृष्ट असले तरी तक्रार करावी तर कुणाकडे असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला गेला.
.. अन् विद्यार्थ्यांसोबत पंगतीला बसले अधिकारी
आमदारांनी मुंढेगावमधील व्यवस्थेचा पंचनामा केला. तर, दुपारी पिंप्री सदोत असंतोष बाहेर पडला. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांना काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. गुरुवारीदेखील, बेचव जेवण मिळाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी अन्न टेकडीवरील खड्ड्यात टाकले. त्यांनी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकी जाधव यांच्याकडे व्यथा मांडली. यानंतर, हे जेवण पुरवणाऱ्या मुंढेगाव येथील सेंट्रल किचनला टाळे ठोकण्यासाठी रवाना झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करत दोन किमी अंतरावरून सर्वांना माघारी फिरवले. तेव्हा विद्यार्थ्यांनी पिंप्री सदो आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. “जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी प्रश्न सोडवत नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला. विद्यार्थ्यांनी स्कूल प्रशासनाविरुद्ध गंभीर आरोप केले. त्यांनी व्यवस्थापक, प्राचार्य आणि ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची गंभीर दखल घेऊन आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, व सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचे समाधान करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रात्री त्यांच्या बरोबर पंगतीला बसून जेवणाचा आस्वाद घेतला आणि तूर्त वादावर पडदा पडला.