Nashik | सौर ऊर्जेने 187 जिल्हा परिषद शाळा प्रकाशमान
जि. प. प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळांचे सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे14 कोटींचा निधी झाला खर्च : सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा समावेश

माॅडेल स्कूलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५२७ जिल्हा परिषदांच्या शाळांनी कात टाकली असतानाच, जि. प. प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळांचे सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांचे वीज बिले थकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन शाळा अंधारात राहतात. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सौर ऊर्जा बसविले जात आहेत. आतापर्यंत १८७ शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आली असून, या शाळा प्रकाशमान झाल्या आहेत. यासाठी १३.९६ कोटींचा खर्च आला आहे.
अशी आहे योजना
जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देणे.
जिल्हा नियोजन समिती माध्यमातून सा. बां. विभागामार्फत वीजपुरवठा नसलेल्या शाळांना सोलर सिस्टीम उपलब्ध करून दिली जात आहे.
मेंटेनन्स फ्री ड्राय बॅटरी युनिट बरोबर एका शाळेतील २ वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी २ ट्यूब लाइट व १ पंखा देखील दिला जात आहे.
सोलार सिस्टीम युनिट कॉस्ट ७.४७ लाख आहे.
प्रत्येक शाळेबाहेर हायमास्ट लॅम्पही उपलब्ध करून दिला आहे.ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानार्जनाचे काम करत असलेल्या जि.प. शाळा वेळेत वीजबिले भरू शकत नसल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित होतो, तर काही शाळांना वीज कनेक्शन मिळालेले नाही. त्यातच शाळांमधील वीज कनेक्शन आणि वीज बिले ग्रामपंचायत स्तरावर अदा करण्यात येते. परंतु काही कारणांमुळे ग्रामपंचायतीकडून वीज बिले वेळेत भरत नसल्याने तेथील शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडतात. शाळांची वीज बिले न भरल्यामुळे अनेकदा शाळेचे मीटर काढून नेण्याचे प्रकार घडले होते. यामुळे अनेक शाळा अंधारात होत्या. शाळांना वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळा होत होता. तसेच डिजिटल शाळांवरही परिणाम होत होता. यात, प्रामुख्याने आदिवासी तालुके असलेल्या सुरगाणा, बागलाण, पेठ तालुक्यांचा समावेश होता. यासंदर्भात शाळांना वीज बिले भरण्यासाठी निधीची मागणी अनेकदा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात निधी देण्याऐवजी तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांनी सौर ऊर्जीकरणासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग या निधीतून शाळांमध्ये सोलर बसवित आहे. पहिल्या टप्प्यात १८७ पैकी ९२ शाळांमध्ये सोलर बसविण्यात आले, तर, दुस-या टप्प्यात ९५ शाळांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात सुरगाणा, इगतपुरी या आदिवासी तालुक्यांतील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे.
शाळाबाहेर हायमास्ट
सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करताना संबंधित कंपनीला शाळेबाहेर हायमास्टही लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोलर बसविण्यात आलेल्या १८७ शाळांबाहेर हायमास्टही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा, परिसरात रात्रीच्या वेळी अंधार नसतो त्यामुळे चोरीचे प्रकारही कमी होण्यास मदत झाली.
- सोलर बसविलेल्या शाळा (तालुकानिहाय शाळांची संख्या)
- चांदवड- ५, देवळा- ८,दिंडोरी- ५,इगतपुरी – १३,मालेगाव – ८,नांदगाव – २०,निफाड- ७,पेठ- ७,सुरगाणा- ३६,त्र्यंबकेश्वर – ९,येवला- २१,एकूण – १८७
शाळेचे वीज बिल थकल्याने आमच्या शाळेत वीज मीटर होते, ते महावितरणने काढून नेले होते. त्यामुळे शाळेला वीज नव्हती. मात्र, शिक्षण विभागाने शाळेवर सोलर बसवले. त्यामुळे आता शाळेला २४ तास वीज मिळत आहे. त्यावर शाळेत दोन संगणकदेखील सुरू आहेत.
देवराम महादू खांडवी, मुख्याध्यापक जि. प. शाळा पालविहीर, ता. सुरगाणा
जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित होऊन शाळा अंधारात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. १८७ शाळांना सोलर बसवल्याने तेथे २४ तास वीज उपलब्ध झाली आहे. १०० टक्के सर्व शाळा सौर ऊर्जीकरण करण्याचा प्रयत्न आहे
डाॅ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक. जिल्हा परिषद