योद्धा एक्सप्रेस न्युज :- धुळे हादरलं! शेतात सापडला 11 हजार किलो गांजा, किंमत ₹22000000; पोलिसांवर संशय कारण…
पोलिसांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केली जात असून पोलिसांवर संशय घेण्यामागे काही कारणं आहेत. ही कारणं कोणती ते पाहूयात...

धुळे जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 11 हजार किलोंचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त गांज्याची किंमत दोन कोटी वीस लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबा गाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. धुळे पोलिसांच्या या कारवाईबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई पोलिसांच यश आहे की अपयश? याबाबतही आता चर्चा होत आहे.
पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध?
गांज्याची झाड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असताना, स्थानिक पोलिसांचे याकडे लक्ष कसे दिले नाही? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या गांजा शेतीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली, मग स्थानिक गुप्तचर यंत्रणा काय कामं करत आहेत? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच या शेतीकडे दुर्लक्ष केलं जातं, अशी चर्चा रंगू लागली आहे. पोलीस अधीक्षकांच्या माहितीवर केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडं पडलं आहे, असाही आरोप केला जात आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन गांजाच्या रोपांची पहाणी करुन पंचनामा केला. तसेच ही गांजाची रोपं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
एकच आरोपी?
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आता या प्रकरणी काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एवढ्या मोठा प्रमाणात गांजा लागवड केली जात असताना स्थानिक पोलिसांना लक्षात का आले नाही? याचा शोध लावणे गरजेचे आहे. एवढा मोठा प्रमाणात गांजा लागवड केली जात असताना आणि विविध क्षेत्रावरती ही लागवड केली जात असून पोलिसांनी या प्रकरणी कैलास पावरा हा एकमेव आरोपी केल्यामुळे देखील पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातं आहे.
कदयाद्याने गुन्हा
गांजाची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. गांजा सेवनावर भारतामध्ये बंदी आहे. तरी काही देशांमध्ये उपचाराचा भाग म्हणून गांजा सेवनाला डॉक्टरांच्या सल्ल्याने परवानगी दिली जाते. भारतात मात्र अशाप्रकारे गांजाची लागवड करणे किंवा त्याचं उत्पादन घेणे कायद्याने गुन्हा आहे.