योद्धा न्यूज !! महाशिवरात्री यात्रेची औंढ्यात जय्यत तयारी; सोमवारपासून सुरूवात : रंगरंगोटी, रोषणाईसह भक्तांच्या सुविधांवर भर
प्रतिनिधी हरिष चव्हाण

प्रतिनिधी नासिक :- औंढा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. औंढा नागनाथच्या यात्रा महोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेसाठी प्रभू नागनाथाच्या मंदिर परिसराची रंगरंगोटी, रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. सोमवारी यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
गतकाळी येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव देशात सर्वदूर सुप्रसिद्ध होता. तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त होते.
येथील रथोत्सवाला देशात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरात आता जागेच्या अभावामुळे यात्रा भरवण्यास जागाच उपलब्ध नसल्यामुळे यात्रेला मात्र उतरती कळा लागली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ पर्वतरांगाच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात असलेले नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांचे व पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
महाशिवरात्र यात्रा महोत्सव 2025 साठी मंदिर प्रशासन सज्ज असून विद्यमान तहसीलदार तथा पदसिद्ध अध्यक्ष हरीश गाडे यांच्या विशेष नियोजनामुळे आणि आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा महोत्सव संपन्न होत असून यात्रा प्रसिद्धी पत्रके काढण्यात आली आहेत.
मे 2020 पासून मंदिर संस्थानवर विश्वस्तांची नियुक्ती धर्मादाय आयुक्तांकडून झाली नसल्याने मंदिराच्या कामकाजावर परिणाम होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात व मंदिरात नवीन 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आली आहेत यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. भाविकांना शुद्ध पाणी व फराळाची विशेष व्यवस्था संस्थान कडून ठेवण्यात आली आहे.
महाशिवरात्रीच्या रात्री महापूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम 26 फेब्रुवारी रोजी होणार असून एक मार्च रोजी महत्त्वपूर्ण रथोत्सवाचा कार्यक्रम रात्री दहा वाजता मुख्य मंदिराला मंदिर प्रांगणात पाच प्रदक्षिणा घालून बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याच दिवशी नगरपंचायतीकडून होत असलेल्या कुस्त्यांसाठी पहिले बक्षीस सुद्धा नागेश्वर नागनाथ मंदिर संस्थान कडून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक नागनाथ पवार यांनी सांगितले. 2 मार्च रोजी सकाळी हभप ढवळे शास्त्री चारठाणकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित असून किर्तनानंतर महाप्रसादाने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.
’महाकुंभच्या सुरक्षाव्यवस्थेत प्रथमच ‘एआय’
गंगा आपली मर्यादा कधी सोडत नाही. काठ सोडून बाहेर पडत नाही. आणि म्हणून गंगेच्या काठावरची शहरे, अगणित गावे सुखेनैव नांदतात आणि त्याच गंगेच्या कुशीत शांत झोपी जातात. माणसांचे तसे नाही.
माणसे सदैव मर्यादा सोडूनच वागत असल्याने प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात केवळ मानवी सुरक्षेवर विसंबून चालणार नव्हते. कदाचित म्हणूनच थेट एआयला म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेलाच इथे तैनात करावे लागले. एआय सुरक्षा लाभलेला हा इतिहासातील पहिला विराट धार्मिक आध्यात्मिक सोहळा ठरला आहे.
नाशिक विशेष
गंगेचे आणि त्यातही तीर्थराज प्रयागराजच्या त्रिवेणीचे पाणी शुद्ध की अशुद्ध ही चर्चा अनपेक्षित नाही. मात्र रोज लाखो भाविक जिथे डुबकी मारत आहेत त्या गंगेच्या, यमुनेच्या, लुप्त सरस्वतीच्या म्हणजेच त्रिवेणीच्या पाण्यात एक ना अनेक एआय कॅमेरे आपल्यावर नजर ठेवून आहेत हे कुणाच्याही गावी नाही. मकरसंक्रांतीला सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यात अखेरच्या दिवसापर्यंत किमान 45 कोटी भाविक पवित्र स्नान करतील हा सुरुवातीचा अंदाज होता. तो आता मागे पडला आणि महाशिवरात्रीचे शाहीस्नान बाकी असताना ही संख्या आता 58 कोटींवर पोचली आहे.
चार हजार हेक्टर पसरलेल्या कुंभनगरीत इतक्या प्रचंड संख्येच्या भक्तसागराला सुरक्षा देण्यासाठी मग मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकारच्या प्रशासनाला आणखी एक कुंभ हाती घ्यावा लागला. त्याचे नाव – डिजिटल कुंभ !
पारंपरिक पद्धतीने गर्दीचे अंदाज न बांधता महाकुंभला रोज येणारी गर्दी मोजण्याची जबाबदारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर- एआय वर टाकण्यात आली.
अर्न्स्ट अँड यंग या जगप्रसिद्ध कंपनीला हे काम देण्यात आले. महाकुंभ नगरीत मैदानावर, घाटाघाटांवर, प्रयागराजमध्ये दाखल होणार्या आणि बाहेर पडणार्या रस्त्यांवर अशा सर्व ठिकाणी बसवलेले एआय कॅमेरे मिनिटामिनिटाला दाखल होणार्या गर्दीचा अंदाज या कंट्रोल सेंटरला देते. सेंटरचे चारशे कर्मचारी सतत या 500 हून अधिक एआय कॅमेर्यांकडून येणारी माहिती आणि 2750 सीसीटीव्हींचे थेट प्रक्षेपण अभ्यासतात आणि त्यानुसार बंदोबस्त कमी अधिक केला जातो.