योद्धा न्यूज !! उत्तर प्रदेशमधील ७५ तुरुंगातील ९० हजार कैदीही करणार त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान, केली अशी व्यवस्था
प्रतिनिधी किरण पाटील योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी येथील त्रिवेणी संगमाला भेट देऊन पवित्र स्नान केलं आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील ७५ तुरुंगात शिक्षा भोगत असलेले ९० हजार कैदीही प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान करणार आहेत. त्यासाठी त्रिवेणी संगमामधील पवित्र पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील जेलमंत्री दारा सिंह चौहान यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून १० वाजेपर्यंत सर्व तुरुंगांमध्ये आयोजित होणार आहे.
राज्यातील ७५ तुरुंग ज्यामध्ये ७ मध्यवर्ती कारागृहांचाही समावेश आहे, येथे सध्या ९० हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंग मंत्र्यांच्या आदेशानुसार या विशेष कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आल्याचे जेल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुरुंग संचालक पी. व्ही. रामासास्त्री यांनी सांगितले की, त्रिवेणी संगमामधून आणण्यात आलेलं पवित्र पाणी तुरुंगातील सामान्य पाण्यामध्ये मिसळून एका छोट्या टाकीत ठेवण्यात येईल. त्यानंतर कैदी प्रार्थनेनंतर या पाण्याने स्नान करतील. लखनौच्या तुरुंगात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुरुंग मंत्री चौहान आणि इतर वरिष्ठ जेल अधिकारी सहाभागी होतील.
गोरखपूर जिल्हा कारागृहाचे जेलर ए. के. कुशवाहा यांनी सांगितले की, तुरुंग प्रशासनाने सुरक्षा कर्मचारी अरुण मौर्य यांना प्रयागराज येथून गंगाजल आणण्यासाठी पाठवलं आहे. प्रयागराजमधील नैनी केंद्रीय कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक रंग बहादूर यांनीही २१ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. तर प्रयागराज जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक अमिता दुबे यांनी कारागृहातील सुमारे १३५० कैदी गंगाजलाने होणाऱ्या स्नानाबाबत उत्साहित आहेत.