योद्धा न्यूज !! छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटविण्याचे भयंकर षडयंत्र!
✍️ महेंद्र कुंभारे संपादक तथा कामगार नेते, भिवंडीसोमवार दि. 10 मार्च 2025 मो.नं. 8888182324

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटविण्याचे भयंकर षडयंत्र!
✍️महेंद्र कुंभारे संपादक तथा कामगार नेते, भिवंडीसोमवार दि. 10 मार्च 2025 मो.नं. 8888182324
हल्ली राज्यातील काही जणांनी औरंगजेबाला पुन्हा पुन्हा जिवंत करण्याचे आणि छत्रपतींचा कसा अवमान होईल याकडे लक्ष केंद्रित केल्याचे निदर्शनास येते. एक विशिष्ट वर्ग यामध्ये सामील आहे. अधूनमधून असे प्रकार घडत असल्यामुळें शिवभक्त किती जागृत आहेत आणि त्यांच्याकडून किती व कसा प्रतिकार होतो, त्यांची प्रतिक्रिया काय उमटते याची चाचपणी चालू असल्याचे लक्षात येते. *ज्यांची लायकी नाही ते ही छत्रपतींवर तोंडसूख घेऊन नंतर थातूरमातूर माफी मागून मोकळे होतात. कोणी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो तर कोणी शौर्यावरच शंका उपस्थित करतो. मात्र, आता छत्रपतींच्या शौर्याचा इतिहासच पुसून टाकण्याचे भयंकर षडयंत्र रचले जात असल्याचे लक्षात येत आहे.
विशेष म्हणजे छत्रपतींच्या रक्ताच्या वारसदारांकडून त्यांच्या विचारांचा अवमान करुन अशी भयंकर प्रतिक्रिया येणे मनाला चटका लावून जाते. महाराजांचे तेरावे वंशज आणि भाजपचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी “औरंगजेबाची कबर उखडून फेका” असे भयंकर वक्तव्य केले.त्याआधी राजकारणातील एक नटी नवनीत राणा हि नेहमी दुसऱ्यांच्या तालावर नाचते (कारण मागे हनुमान चालीसा स्वतःच्या घरात न वाचता उध्दव ठाकरेंच्या घरात वाचण्याचा हट्ट धरला त्यावरुन राजकारण तापवले हे कोणाच्या सांगण्यावरुन केले हे लोकांच्या सहज लक्षात आले, असो) तिनेही असेच वक्तव्य केले. त्यानंतर कोकणातले मंत्री नितेश राणे हे सुध्दा औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. *सर्वात महत्वाचे आणि दुर्देव असे की, महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया अशी आहे की, “”राज्यातील प्रत्येकाला औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असे वाटते” पण काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. त्या झटकन होत नाहीत. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले. तर ती काँग्रेसच्या काळात जतन करण्यात आली आहे. तेंव्हापासून ती कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आता राज्यातील प्रत्येकाला असे वाटते म्हणजे हे दोन चार लोकांना वाटणे म्हणजेच संपुर्ण राज्य आहे का? आणि पुरातत्व खात्याच्या संरक्षणाखाली नसती तर ती तुम्ही नक्कीच उखडून काढली असती असा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजेच इतरांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही महाराजांचा इतिहास मिटावा असे वाटते का?परंतु, सर्वांनी आधी एकदा इतिहास वाचावा. मराठेशाहीचे छत्रपती युवराज शाहू महाराज, जेंव्हा औरंगजेबाच्या कबरीवर आले तेंव्हा त्यांनी स्वतःच्या पायातली चप्पल/पायदान बाजूला सारले अन् नंतर आत प्रवेश केला. *त्यांना त्यावेळी विचारले गेले की, “औरंग्या” आपल्या मातीचा आणि स्वराज्याचा दुश्मन मग हि औपचारिकता का? तेंव्हा युवराज शाहू महाराज म्हणाले, “आमच्या माँ जिजाऊ, छत्रपती शिवराय अन् आमचे पिता शंभू महाराजांची हि शिकवण आहे की, ” शत्रू मेला वैर संपले”. त्या देहाचा आदर करणे हा आपला धर्म आहे.* तसेच जेंव्हा अफजलखान पन्हाळ्याच्या पायथ्याला कृष्णाजी कुलकर्णी समवेत महाराजांनी मारला. तेंव्हा माँ जिजाऊंनी मंत्र्यांना आदेश दिले “अफजल मेला वैर संपले, त्याच्या देहाला नीट ठेवा अन् इस्लाम धर्मानुसार त्याचा अंत्यविधी उरकून घ्या”.
अहो महाराजांच्या दुश्मनांनो त्याच कबरी जर आपण या मातीतून उखडून टाकू तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहास काय सांगणार? रामायणातून रावण आणि स्वराज्यातून औरंगजेब काढला तर शिवराय व राम यांच्या कर्तृत्वाला महत्व उरणार नाही. महाराजांचा इतिहास पुसण्यासाठी या अधुनिक युगात अजूनही अनाजी पंत कार्यरत आहेत. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा अजूनही जिवंत आहे. या कपट कारस्थानी अनाजी पंतांच्या औलादींनी यापुढे महाराजांच्या शौर्यावर शंका उपस्थित केल्यास अथवा कबरी उखडण्याचे षडयंत्र रचल्यास शिवभक्त तुम्हाला आयुष्यातून उठवतील हे लक्षात ठेवा!