योद्धा न्युज!! फक्त एक रुपयाच्या नोटेवर भारत सरकार का लिहिलेले असते ?

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
१ रुपयाची नोट ही चलनातील सर्वात छोटी नोट आहे. ३० नोव्हेंबर १९१७ रोजी पहिल्यांदा एक रुपयाची कागदी नोट चलनात आली. ही नोट बँक ऑफ इंग्लंड मध्ये छापण्यात आली होती.
एक रुपयाची नोट ही भारतीय चलनात किमतीने सर्वांत लहान असली, तरी अधिकाराने ती मोठीच आहे. कारण, इतर सर्व नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणल्या जात असल्या, तरी एक रुपयाची नोट मात्र भारत सरकार चलनात आणते. म्हणूनच एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि त्यावर भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. त्यामुळे, एक रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी नसते. व्यवहारात एक रुपया मूल्य असणाऱ्या नोटेच्या छपाईसाठी बराच खर्च येतो. आरबीआय नुसार १९२६ मध्ये पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. १९४० साली ही छपाई पुन्हा सुरु करण्यात आली. नंतर, पुन्हा १९९४ मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये या नोटेची छपाई पुन्हा सुरु करण्यात आली.
२०२० च्या फेब्रुवारी मार्च महिन्यात, वित्त मंत्रालयाने एक रुपयाच्या नव्या नोटेची छपाई सुरु करण्याचे ठरवले. अर्थात, एक रुपयांच्या नोटा नियमितपणे छापल्या जात नाहीत. एक रुपयाची नोट वित्त मंत्रालय द्वारा जारी केली जाते आणि त्यावर वित्त सचिवांच्या स्वाक्षऱ्या असतात. RBI कलम २२ नुसार, एक रुपयाची नोट वगळता, विविध मूल्यांच्या चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार RBI ला आहे, आणि त्यावर RBI च्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.