योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!१९ वर्षांनंतर ठाकरे बंधू आज एका व्यासपीठावर : मराठी विजय मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन, नव्या समीकरणाकडे लक्ष
मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ नासिक मो.+917517563153

YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ संचलित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत
योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!१९ वर्षांनंतर ठाकरे बंधू आज एका व्यासपीठावर : मराठी विजय मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन, नव्या समीकरणाकडे लक्ष
हिंदी सक्तीबाबत सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर काढण्यात येणा-या मोर्चाऐवजी आज मराठी विजय मेळावा होत असून, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर एकत्र येत असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करून याची चुणूक दाखवण्यात येणार आहे.
मुंबईतील वरळी डोम येथे आज शनिवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील.
या विजयी रॅलीत प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेकाप), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणे होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांनाही भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचे भाषण उद्धव ठाकरे यांचे असणार आहे.
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी याला कडाडून विरोध करीत याविरोधात ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यात सहभागी होण्याची घोषणा केली होती; परंतु त्या आधीच सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचे ठरले. त्यानुसार वरळीत या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. मनसे-शिवसेना ठाकरे गटाने वरळी डोम परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात केली आहे.
या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्र फोटो पहायला मिळत आहेत. आम्ही गिरगावकर या संघटनेकडून ‘जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत, त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाही तर कायमचे गुजरातला पोहोचाल आणि सभा झाल्यावर आदेश द्या, मराठी महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचे आहे.
आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहे तसेच ‘ब्रँड मराठीचा फक्त ठाकरेच महाराष्ट्र माझा’ अशा प्रकारचे बॅनरही या परिसरात लावण्यात आले आहे. या बॅनर्सची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.