योद्धा ब्रेकिंग न्यूज-इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील साईनाथ नगरमध्ये डिम फर्निचर दुकानाला लागलेली भीषण आग; लाखोंचे नुकसान, पाच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
प्रतिनिधी :- हरिष चव्हाण नासिक

योद्धा न्यूज प्रतिनिधी
नाशिक: नासिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात साईनाथ नगरमधील डिम फर्निचर दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून दुकानात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी तत्काळ पाच अग्निशामक बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्यामागे आपसातील वाद ही शक्यता असून, या घटनेवरून परिसरात चर्चा सुरू आहे. काहींनी आपसातील भांडणामुळे आग लावल्याची शक्यता व्यक्त केली आहे, मात्र अधिकृत तपास अहवाल येण्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे अव्यवहार्य ठरेल.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, दुकानात असलेले सर्व फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून आग लवकरच विझवली जाईल अशी आशा आहे.
आगीची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे होते.
सध्या घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दल उपस्थित असून, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.